Mahrashtra

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण ; गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले : विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर

Share

मुंबई प्रतिनिधी ,२७ जून :

उद्योग आणि आर्थिक गुंतवणुकीत महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातने दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला मागे टाकल्याची धक्कादायक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानी होते. मात्र, वर्षभरात या स्थानावरून घसरण होत महाराष्ट्र सहाव्या स्थानावर फेकला गेला असून गुजरातने दरडोई उत्पन्नात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात १.९ टक्के वाढ अपेक्षित असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत तृणधान्य, कडधान्ये, तेलबिया, ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे २३ टक्के, १० टक्के, २ आणि १७ टक्के इतकी घट अपेक्षित असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

सन २०२३-२४ मध्ये देशाच्या आणि राज्याच्या अर्थसव्यस्थेतील वाढ प्रत्येकी ७.६ टक्के वाढ असेल, असा अंदाज पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार २०२३-२४ साठी राज्याची महसुली जमा ४ लाख ८६ हजार १६ कोटी असून महसुली खर्च ५ लाख ५ हजार ६४७ कोटी आहे. गेल्या आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष महसुली खर्च ३ लाख ३५ हजार ७६१ कोटी रुपये असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय राज्यावरील कर्जात १६.५ टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मार्च २०२४ अखेर राज्यावरील कर्जाचा आकडा ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपयांवर पोहचला असून कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या २५ टक्के आहे. मार्च २०२३ अखेर राज्यावर ६ लाख ४९ हजार ६९९ कोटी रुपये इतके कर्ज असेल, असा अंदाज गेल्या वर्षी वर्तविण्यात आला होता.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या गुरुवारच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी हा अहवाल दोन्ही सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दरडोई उत्पन्न आणि कृषी उत्पादनातील घट याबाबत नकारात्मक चित्र समोर आल्याने अधिवेशनात विरोधी पक्षाच्या हाती आयते कोलीत सापडले आहे.

राज्याची आर्थिक सुस्थिती स्पष्ट करणाऱ्या घटकांपैकी एक असलेल्या दरडोई उत्पन्न या निकषात तेलंगणा हे राज्य देशात अव्वल ठरले आहे . कर्नाटकला मागे टाकत तेलंगणाने दरडोई उत्पन्न वाढीत बाजी मारली आहे. दरडोई उत्पन्नात तेलंगणा पाठोपाठ कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि गुजरात असा क्रमांक लागतो. महाराष्ट्र सहाव्या स्थानी असले तरी २०२२-२३ च्या तुलनेत राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये दरडोई उत्पन्न २ लाख १९ हजार ५७३ रुपये होते ते वाढून २०२२-२३ मध्ये २ लाख ५२ हजार ३८९ रुपये झाले आहे . २०२३-२४ मध्ये दरडोई उत्पन्न २ लाख ७७ हजार ६०३ रुपये असेल, असा अंदाज अहवाला व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या वर्षी सर्वदूर समाधानकारक पाऊस होऊनही धान्य उत्पनादात घट अपेक्षित आहे. २०२३-२४ च्या खरीप हंगामात राज्यात १५५ ६४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. तथापि, मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य, कडधान्य, तेलबिया आणि ऊस यांच्या उत्पादनात घट अपेक्षित असून कापसाच्या उत्पादनात मात्र ३ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे . रब्बी हंगामातही मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य तसेच कडधान्यात अनुक्रमे पाच आणि चार टक्के घट अपेक्षित आहे. कृषी उत्पादनाची आकडेवारी काळजीत टाकणारी असली तरी कृषी आणि संलग्न क्षेत्र, उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे १.९, ७.६ आणि ८.८ टक्के इतकी वाढ अपेक्षित आहे.

सिंचनाची टक्केवारी नाही

सिंचन घोटाळ्याचे आरोप होऊन आणि त्याची चौकशी होऊन जवळपास १४ वर्ष उलटली तरी राज्यातील सिंचनाची टक्केवारी देण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. सन २०१२ पासून आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील सिंचनाची टक्केवारी दिली जात नाही. यावर्षीच्याही अहवालातही आकडेवारी गुलदस्त्यात आहे. मात्र, राज्यातील मोठ्या, मध्यम, आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे जून २०२२ अखेर ५५. ६० लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र ४२.३३ लाख हेक्टर क्षेत्र होते . पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत सन २०२२-२३ पर्यंत सुमारे १०. ७६ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले. तसेच २०२२-२३ मध्ये या योजनेच्या अंतर्गत १ लाख ७३ हजार ४३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५११ कोटी ९८ लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

आर्थिक पाहणी अहवालाची वैशिष्ठे

सुधारित अंदाजानुसार राजकोषीय तुटीचे प्रमाण राज्य उत्पन्नाशी २.८ टक्के, महसुली तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण ०.५ टक्के आहे.

राज्याच्या वार्षिक योजनांवरील खर्च २ लाख ३१ हजार ६५१कोटी रुपये असून त्यापैकी २०हजार १८८ कोटी रुपयांचा खर्च जिल्हा वार्षिक योजनांवरील आहे.

जानेवारी २०२३ पासून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत २०२३-२४ मध्ये ४९ हजार ५११ कामे पूर्ण झाली असून त्यावर ९४७ कोटी ५४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजेतून मार्च २०२४ पर्यंत ३२.२७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना २० हजार ४९७ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला.

गेल्या आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ६० हजार १९५ कोटीचे पीक कर्ज तर ९३ हजार ९२६ कोटींचे कृषी मुदत कर्ज वितरित करण्यात आले.

राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून ९२.४३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २८५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

Related posts

महाराष्ट्रात भाजपाला देवेंद्रजींचेच नेतृत्व ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

editor

श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरंध एच .एस. सी .परीक्षा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

editor

कासेगाव येथील शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आमरण उपोषण सुरु

editor

Leave a Comment