Civics Mahrashtra politics

महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळणार ; भाजपा आ. दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

Share

मुंबई :


राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान नुकतेच संपन्न झाले आहे. या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच यावेळी दरेकर यांनी निवडणूक यंत्रणेच्या व्यवस्थेवरही नाराजी व्यक्त करत निवडणूक यंत्रणा राबविणाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही केली आहे.

दरेकरांनी म्हटले कि, महायुतीला आमचे ४५ हुन अधिकचे टार्गेट होते. त्याच्या जवळपास जाऊ. शंभर टक्के ४० च्या वर जागा या भाजपा आणि महायुतीला मिळतील याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही. एवढे जोरदार मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील जनतेने केले आहे.

तसेच अंडरकरंट हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी असू शकतो, त्यांनी केलेल्या विकास कामांसंदर्भात असू शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारबाबत कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी नव्हत्या. पुन्हा एकदा देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत हा जनाधार बोलत होता. मोदींसाठी वस्त्यावस्त्यांतील लोकांनी तीन-तीन तास रांगेत उभे राहून, अव्यवस्था असून, घामाने ओलेचिंब होऊनही मतदान केल्याचे दरेकरांनी म्हटले.

निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर बोलताना दरेकर म्हणाले कि, शंभर टक्के निवडणुक यंत्रणाच जबाबदार आहे. निवडणुकीचे बूथ, व्यवस्था ठरविताना अधिकाऱ्यांनी तिथली व्यवस्था पाहण्याची आवश्यकता होती. कोंबड्यांचा खुराडा असतो त्या खुराड्याप्रमाणे बूथ केले होते. पाण्याची व्यवस्था नव्हती, व्हेन्टीलेशन नव्हते याला सर्वस्वी निवडणूक यंत्रणाच जबाबदार आहे. मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी लोकं महत्वाची आहेत. लोकशाहीचा उत्सव होतं असताना मतदानाची काळजी घेण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणावर लोकं मतदानाला येत असतात त्यावेळेला आपली जबाबदारी आहे. निवडणूक यंत्रणा राबविणाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई व्हायला हवी, असेही दरेकर म्हणाले.

रोहित पवार यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले कि, रोहित पवार भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांनी ट्विटर, सोशल मीडिया यासाठी शे-पाचशे लोकं पेड ठेवलेली आहेत. जनतेत न जाता, जनतेच्या संवेदना न समजता केवळ ट्विटर, सोशल मीडियावर बोलत असतात. रोहित पवार हे दखल घेण्यासारखे नेते नाहीत, अजून त्यांना खूप कामं करायचे आहे.

Related posts

भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ – प्रकाश आंबेडकर यांची टीका

editor

India’s Foreign Minister Confronts Western Allegations and Influence

editor

विधानसभेला अजितदादांना सहानुभूती मिळेल ! प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विश्वास

editor

Leave a Comment