कल्याण , दि.16 नोव्हेंबर :
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील निवडणूक भरारी पथकाने शिळफाटा रोडवर तपासणी करताना एटीएम व्हॅनमधून साडे पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही व्हॅन हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनीची असून नवी मुंबईवरून डोंबिवलीच्या दिशेने जात होती.
यावर अधिकची माहिती देताना निवडणूक अधिकारी यांनी सांगितलं की, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2024 ची आचारसंहिता चालू आहे. आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत आहेत . 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये असेच एक पथक शीळ फाट्यावर कार्यरत आहे .
आज सकाळी नियमित वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश आढळून आली आणि त्या वाहन चालकाकडे कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्र आढळून आली नाहीत नियमानुसार जर का दहा लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्हाला तसं कळवाव लागतं आणि त्यांच्याकडं ती रक्कम सोपवावी लागते . रक्कम जवळजवळ 5 कोटी 55 लाख इतकी आहे. ती विहित रकमेपेक्षा जास्त असल्याने आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवले
या व्हॅनमध्ये 5 कोटी 55 लाख रुपये सापडले असून व्हॅनमधील रोख रक्कमेबाबत दस्तऐवज मागितले असता योग्य दस्ताऐवज दिले नसल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या कॅश बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी काही QR कोड पुरावेदाखल दिले; मात्र तेही तंतोतंत जुळलेले नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी याची माहिती आयकर विभागाला दिली असून पुढील चौकशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.