Civics Mahrashtra politics

आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, वयाच्या 71 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Share

कोल्हापुर : 23 मे

काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीर चे आमदार पी. एन. पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालावली. रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती. यानंतर कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालावली असून, राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सध्याच्या राजकारणात पक्षासाठी असलेली निष्ठा बाजूला ठेवून स्वार्थ साधून घेण्यासाठी सुरू असलेल्या राजकारणाने राजकारण दूषित झाल आहे. असे असताना देखील काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी एन पाटील यांची राज्यात ओळख आहे. गेल्या ४० वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून २००४ आणि २०१९ असे दोन वेळा आमदार झाले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे.


आमदार पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांचा जन्म ६जानेवारी १९५३ सालचा. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील रहिवाशी. पी. एन. पाटील हे पहिल्यांदा २००४ मध्ये त्यावेळच्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. तत्पूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी २००९ व २०१४ मध्ये करवीरमधून निवडणूक लढवली. मात्र, या दोन्हीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालिन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून २००९ व २०१४ च्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. आमदार पी.एन. पाटील हे गेल्या ४० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते. ते 1999 पासून ते 2019 असे तब्बल 22 वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. ते सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस चे उपाध्यक्ष आहेत. या शिवाय सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपले पाय घट्ट रोवले असून, जिल्हा बँकेत ते 35 वर्षाहून अधिककाळ संचालक म्हणून राहिले आहेत. तर १९९९ पासून सलग पाच वर्षे ते बँकेचे अध्यक्ष ही होते. तसेच जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात देखील त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत २५ वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवलं. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या भोगावती साखर कारखान्याचेही ते सध्या अध्यक्ष असून, त्यांच्या प्रयत्नातूनच कारखाना सुस्थितीत येत आहे.


आमदार पी. एन. पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेक चढ-उतार, बंडखोरी पहिली मात्र ते कधीही वेगळ्या पक्षात जाण्याचा विचार केला नाही. आमदार पी. एन. पाटील माझी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी घराण्याची एकनिष्ठ होते. यामुळे त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहाणे पसंत केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रति असलेल्या निष्टेमुळे त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवलं. तर या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी खास काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ही कोल्हापुरात आल्या होत्या. तसेच पी एन पाटील यांनी दिंडनेर्ली येथे सूतगिरणीची उभारणी करत त्याला राजीव गांधी यांचे नाव दिले. तसेच अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. दरवर्षी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पी एन पाटील यांच्या प्रयत्नातून दरवर्षी कोल्हापूर ते दिंडनेर्ली सद्‌भावना दौड काढण्यात येते. या कार्यक्रमासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते हजेरी लावत असतात.

तर राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांचे घनिष्ट संबंध होते. विधानसभा निवडणुकीतील पी एन पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ हे विलासराव देशमुखच करायचे. आमदार पी. एन. पाटील यांचे एक सुपुत्र राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तर दुसरे पुत्र राजेश यांच्याकडे अन्य व्यवसायाबरोबरच श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्षपद आहे. त्यांच्या कन्या टिना या कराडमध्ये स्थायिक आहेत.आज पी एन पाटील यांच्या निधनामुळे करवीर मतदार संघासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Related posts

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील साठा जुलै अखेरपर्यंत राहील: BMC

editor

जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या पुरस्काराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

editor

कागल, पिंपळगाव खुर्द, येथे उभारण्यात येणार नवीन शासकीय होमिओपॅथी विद्यालय

editor

Leave a Comment