Civics Mahrashtra politics

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

Share

मुंबई दि. ३ मे : 

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.)यांची नियुक्ती केली आहे.

मतदान केंद्रावरील आवश्यक त्या सोयीसुविधा आणि उपाययोजना बाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांचा सातत्याने आढावा सुरू आहे.

मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

तसेच टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी १४ टेबल व सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.


मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. यामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ १८, शिवडी -१९, भायखळा -१९, मलबार हिल-२०,मुंबादेवी -१६, कुलाबा -२० अशा फेऱ्या होणार आहेत. तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघ-१९, चेंबूर- २१, धारावी-१९, शीव-कोळीवाडा -१९, वडाळा-१८, माहिम १८,अशा फेऱ्या असतील

सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत.


मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

Related posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती उपक्रमांचे आयोजन

editor

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती

editor

हरियाणातील अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजप सरकार अल्पमतात

editor

Leave a Comment