मुंबई प्रतिनिधि,८ जुलाई :
मुंबईसह राज्यात दमदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. रात्रभरात मुंबईत झालेल्या पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे.
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचले आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचले आहे.
पावसाचा रस्ते वाहतुक आणि लोकल सेवेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय
.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ॲानलाईन केंद्राच्या ८ जुलै रोजी दुपारी ११ः०० ते २ः०० या वेळेत होणाऱ्या परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलल्या आहेत, आता या परीक्षा १३ जुलै रोजी होतील, परीक्षेची वेळ आणि ठिकाण सारखेच राहील
ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा ठप्प
मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर झालेला दिसून येत आहे. ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. तसेच ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतुक देखील सध्या ठप्प झाली आहे. पश्विम रेल्वेवर सध्या काहीही परिणामा झालेला नाही. लांब पल्ल्याच्या एक्प्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन देखील रद्द करण्यात आली आहे.
शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आज शाळांना सुट्टी जाहीर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पुराच्या पाण्यात गाडी घालणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. पुराची परिस्थिती अशीच राहील्यास शाळांना सुट्टी देण्यात येईल अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी
रायगड जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले, आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी कऱण्यात आले असुन जिल्हा प्रशासन सज्ज आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या किल्ले रायगडवाडी येथील युवक काल दुपारी किल्ले रायगडाच्या शेजारी असणाऱ्या धबधब्यावरून वाहुन गेला त्यांनंतर जिल्हयात पुन्हा एकदा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी
सकाळपासून रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणारे प्रवासी आणि नाशिकहून जळगाव भुसावळ कडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर बसून रेल्वेची वाट बघावी लागत आहे. दैनंदिन कामासाठी आणि नोकरदारांसाठी रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने मोठा फटका बसतोय तर, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच बसून रेल्वेची वाट बघावी लागत आहे.
रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज रोजीपासून रायगड किल्ला पर्यटक तसेच शिवभक्त यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे . रायगड किल्ले परिसरात काल रविवारी सायंकाळी अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने इतिहासात प्रथमच किल्ल्यांच्या पायऱ्यावरून अक्राळ विक्राळ स्वरूपात पाणी वाहू लागल्याने किल्ल्यावर आलेले पर्यटक अडकले, सुदैवाने हे सगळे पर्यटक बचावले, काल अचानक उद्भवलेली ही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पायरी मार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय महाड तालुका प्रशासनाने घेतला