मुंबई, दि. ११ प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात १९ जुलै रोजी ही वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
मात्र, लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याबाबत दावे करण्यात आले आहेत. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी याबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली होती. त्यावरून चर्चा सुरू असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याबाबत निवेदन केले.राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून विधानपरिषदेच्या ११ सदस्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे होत आहेत. याबाबच राज्य सरकारकडून विधानसभेत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली असून ही वाघनखं शिवरायांचीच असल्याचं आमच्याकडे आलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असल्याचं ते म्हणाले.
अनेक शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवावे. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. १० नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवलं. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनख शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचे उत्तर आले. १८२५ रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यासाठी अनेक शिवभक्तांनी माहिती देणारी टिप्पणे पाठवल्याचेही ते म्हणाले.“आम्ही माहिती घेतली की यासंदर्भात जगात इतरत्र कुठे काही उपलब्ध आहे का? इतर ठिकाणच्या पुराव्यांमध्येही माहिती देण्यात आली आहे. ही वाघनखे लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. १८७५ व १८९६ साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आले. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखे दर्शनासाठी देऊ असे सांगितले. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखे आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
१९ जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे असेही मुनगंटीवार म्हणाले.