मुंबई प्रतिनिधि ,७ जुलाई :
आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि त्यांच्या पक्षावर टीकास्त्र सोडले.जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप प्रणित सरकारवर टीका केली.
ते म्हणाले, आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे. केंद्र किंवा राज्यसरकार दुसऱ्या पक्षातील ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी नेते आपल्या पक्षात घेतात. त्यानंतर आमची ताकद किती वाढली हे दाखवतात. सुरुवातीला या सर्वांवर भ्रष्टाचारासंदर्भात आरोप करायचे, त्यांच्यावर ईडी, सीबीआयचे खटले दाखल करायचे. ते शरण आल्यावर पक्षात त्यांचा प्रवेश करायचा, नंतर क्लीन चिट द्यायची, असे ब्लॅक मेलिंग सरकार कडून केले जात आहे. त्यात वायकरही आहेत. वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरुन पळून गेले. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
रवींद्र वायकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना छळणाऱ्या ईओडब्लू म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांवर खटला दाखल करा, अशी मागणी राऊत यांनी गृह तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.