धुळे ,१७ जून :
पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १९ तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पूर्ण झाली असून या भरती प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
मात्र दुसरीकडे पावसाळ्यात होणाऱ्या मैदानी चाचणीला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी परिपूर्ण काळजी घेण्यात यावी. अन्यथा मैदानी चाचणीची प्रक्रिया दोन महिने पुढे ढकलावी, तसेच वयोमर्यादा संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, तो देखील त्वरित घ्यावा अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. मैदानी चाचणीला कुठलीही अडचण आल्यास तसेच आमचे नुकसान झाल्यास राज्य शासन त्याला जबाबदार राहील.
शासनाकडे एकच मागणी आहे की, जर तुम्ही पावसाळ्यात ग्राउंड घेत आहात. तर विद्यार्थ्यांची १००% सोय देखील करा.त्यांचे हाल झाले नाही पाहिजे. आमची मेन्टॅलिटी डिस्टर्ब करणे, हे शासनाला देखील महागात पडू शकते.त्यामुळे भरतीप्रक्रिया घ्यायची असेल, तर पूर्ण तयारी करूनच घ्या. अन्यथा पावसाळा संपल्यावर भरती प्रक्रियेला सुरूवात करा.