Civics Mahrashtra

पाऊस कोसळत असताना कृपया झाडांखाली थांबू नये, वाहने उभी करू नयेत : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

Share

मुंबई, १२ जून :

बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन ठिकठिकाणी छाटणी देखील केली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, तसेच वाहनेदेखील झाडांखाली उभी करू नयेत, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्यान विभागाने योग्य ती खबरदारी घेवून कार्यवाही केली आहे.

पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबई महानगरातील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेता नागरिकांनी पावसात झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड पडण्याची अथवा फांदी तुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसापासून बचाव करताना नागरिकांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे. याबाबत उद्यान विभागाने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी माहिती पत्रके प्रदर्शित करून जनजागृती केली आहे.

इमारती तसेच गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती धोकादायक वाटणाऱया झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात (वॉर्ड) उद्यान विभागाशी संपर्क साधावा किंवा १९१६ या नागरी सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. तसेच मुंबईकरांनी आपल्या इमारती, सोसायटी आवारातील धोकादायक झाडांची रितसर परवानगी घेऊन छाटणी करून घ्यावी आणि संभाव्य धोका टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Related posts

आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, वयाच्या 71 वर्षी घेतला अखेरचा श्वास

editor

उल्हासनगर मनपातर्फे वालधुनी नदी स्वच्छता अभियान

editor

जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान करू – अजित पवार

editor

Leave a Comment