मुंबई , १२ जुलै :
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत घराच्या छतावर ‘सोलर रुफ टॉप’ यंत्रणा बसविण्यात येत असून या योजनेचा लाभ मिळवून देण्यामध्ये महाराष्ट्र वेगाने पुढे जात आहे. या योजनेला राज्यात आणखी गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य राम शिंदे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रवीण दरेकर, आमश्या पाडवी, अभिजित वंजारी, अशोक उर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, डॉ.मनीषा कायंदे, विक्रम काळे, प्रवीण दटके, किरण सरनाईक आदींनी उपप्रश्न उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या योजनेअंतर्गत सुमारे १४ हजार ग्राहकांना अनुदानाची ६० टक्के रक्कम डीबीटीच्या माध्यमातून देण्यात आली असून उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारच्या पोर्टलवर तांत्रिक अडचण येत होती. या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली असून तांत्रिक अडचण दूर केली जात आहे.
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांना या योजनेचा लाभ पोहोचवण्याबाबतच्या उपप्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, वन कायद्यानुसार तेथील रहिवाशांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. तथापि ते होईपर्यंत पर्यायी मार्गाने वीज देण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळांमध्ये वीज बील न भरल्याने वीज पुरवठा बंद केल्याच्या घटना घडू नयेत यासाठी सोलारच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याबाबत योजना तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने मुख्य क्षेत्रापासून दूर असलेल्या रहिवाशांसाठी प्रामुख्याने ही योजना आहे. त्यामुळे मागणीनुसार या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे सांगून उपमुख्यमंत्री यांनी सध्या एक कोटी ग्राहकांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून या योजनेला अधिक गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.