छ.संभाजीनगर , दि.16 डिसेंबर :
परभणीत 10 डिसेंबरला संध्याकाळी एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान शिल्पाची विटंबना केली होती. यानंतर परभणीतील आंबेडकरी समाज आक्रमक झाला होता. आंबेडकरी अनुयायींकडून परभणीत जाळपोळ करत निषेध नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा समावेश होता. काल सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला.
आज छ.संभाजीनगर शहरात या घटनेच्या निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याला प्रतिसाद देत आंबेडकरी पक्ष संघटनांनी छत्रपती संभाजीनगर शहर बंदची हाक दिली आहे. आज आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे.
तसेच व्यापारी, शिक्षण संस्था व रिक्षा चालकांना शांततेने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले. सोमनाथ सुर्यवंशी याला न्याय मिळावा, परभणीत हिंसाचार केलेल्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.