Civics health Mahrashtra

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गर्भ-लिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ,स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्याचे दिले निर्देश

Share

मुंबई, दि. 21 :

अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात महिला पुढे येवून माहिती देतात, अशा महिलांचे मानधन वाढविण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला.

राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस यंत्रणेच्या समन्वयाने अशा प्रकरणावर कारवाया वाढविण्यात याव्यात, अशा सूचनाही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य भवन येथे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायदा (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस सचिव विरेंद्र सिंग, आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ नितीन अंबाडेकर, सहसंचालक कमलापुरे आदी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगर पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यात स्त्री – पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारणेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासोबतच अवैध गर्भपात रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. गुन्हा सिद्ध करून कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशा प्रकरणात गुन्हे सिद्धता वाढविण्यात येईल. आंतरराज्य जिल्ह्यामध्ये शेजारच्या राज्यातील जिल्ह्यातील प्रशासनाशी समन्वय साधून दोषींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, अवैध गर्भपात प्रकरणात दाखल केसेस जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच गर्भपात करण्यात येणाऱ्या गोळ्या सहज उपलब्ध होवू नये, यासाठी काळजी घेण्यात यावी. ऑनलाईन विक्री होत असल्यास याबाबत पडताळणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी. जिल्हा स्तरावर असलेल्या समित्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतील नागरिकांचा सहभाग करण्यात यावा. या समित्या आणखी सक्षम करण्यात यावी. खबरी बक्षीस योजनेतील बक्षीस वाढविण्याबाबत कार्यवाही करावी.

तसेच राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले.

आरोग्य मंडळाच्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालये उभारण्याबाबत पुढील वर्षात आर्थिक तरतुदीची मागणी करण्याबाबत सूचना देताना आरोग्य मंत्री अबिटकर म्हणाले, नाशिक व अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालय कार्यान्वित झाली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा शोधून निधीची मागणी करण्यात यावी. मागील आर्थिक वर्ष 2024 – 25 मध्ये मिळालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात यावा. याबाबत विहित कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती तसेच तक्रारीच्या अनुषंगाने संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी. या संपर्क यंत्रणेचे केंद्र मुंबईत असावे. महात्मा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

Related posts

प्रत्येक आगारात साजरा होणार ” प्रवासी राजा दिन..! “-दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन…-१५ जुलै पासून सुरुवात..

editor

आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

editor

अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित ; विधान परिषदेत बहुमताने ठराव मंजूर

editor

Leave a Comment