ठाणे , दि.16 नोव्हेंबर:
आजही निवडणुका रस्ते,वीज आणि पाणी याच विषयावर लढवल्या जात आहेत. तुमच्या मतांचा अपमान झाला असुन देशात महाराष्ट्र ‘मजाक ‘ बनला आहे.तेव्हा, नवा विचार करा, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी एकदा मनसेला संधी द्या. असे आवाहन करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, येत्या २० तारखेला गाफील राहु नका. अशी साद मतदार राजाला घातली.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव ,ओवळा – माजिवडा मतदार संघातील संदीप पाचंगे आणि कळवा-मुंब्रा मतदार संघात ॲड.सुशांत सूर्यराव या तीन उमेदवारांसाठी शुक्रवारी रात्री राज ठाकरे यांची जाहिर सभा ठाण्याच्या गावदेवी मैदानात पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी परखड विचार मांडले.
माझा उमेदवार जिंकून आल्यानंतर भेटायची कोणतीही अपॉइंटमेंट तुम्हाला लागणार नाही
मतदारांनो एकदा संधी गेली तर ५ वर्ष जातात. एवढे वाटोळं झाले आहे ना फक्त एकदा संधी द्या आणि येत्या २० तारखेला गाफील राहू नका, गेल्या ५ वर्षात झालेला मतांचा अपमान विसरू नका असे विधान ठाकरे यांनी केलेलं. २४ तास तुमच्यासाठी धावणारी ही तरुण मुले उमेदवार म्हणून तुमच्यासमोर दिले आहेत. हे माझा उमेदवार जिंकून आल्यानंतर तुम्हाला त्यांना भेटायची कोणतीही अपॉइंटमेंट ची गरज तुम्हाला लागणार नाही असा विश्र्वास राज ठाकरे यांनी आजच्या सभेत दिला.
४८ तासात भोंगे उतरवणार
मशिदेवरचे भोंगे खाली काढलेच पाहिजे, आपली सत्ता आल्यास ४८ तासांच्या आत खाली उतरवेन.तसेच एकदा हातात सत्तेत द्या, सर्वांना वठणीवर आणतो की नाही बघा असा इशारा यावेळी ठाकरे यांनी दिला. आम्हाला पण प्रत्येक धर्माचा अभिमान आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म घराच्या आता ठेवला पाहिजे असे देखील राज ठाकरे यांनी आजच्या सभेत स्पष्ठ केले..
मंदिरे नव्हे, विद्यामंदिरे हवे आहेत
उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधू असं वचन दिले आहे. या वचनाम्या विरोधात राज ठाकरे यांनी कडाडून टीका करत. शिवाजी महाराजांचे मंदिर नाही तर विद्यामंदिरे हवे आहेत असे सांगीतले. गडकिल्ले बनायची आहेत. महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचे असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगितले.