वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच प्रवाशांची होतेय सोय
मुंबई,२६ जून :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असणा-या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्नत मेट्रो स्थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे ‘जिओ पॉलिमर’ तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच स्थानिक रहिवाशांनादेखील दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहेत. तसेच रस्ते वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एम.एम.आर.डी.ए.) ने अंधेरी – पूर्व ते दहिसर – पूर्व मेट्रो रेल्वे प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या मेट्रो कामादरम्यान सिमेंट काँक्रिट रस्त्याला बाधा पोहोचली. त्यामुळे महामार्गावरील नियमित वाहतूक प्रभावित झाली. स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांनी या बाबतच्या तक्रारी महानगरपालिका प्रशासनास केल्या. या तक्रारींची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी गंभीर दखल घेतली. गुंदवली मेट्रो स्थानक परिसरातील काँक्रिट रस्ता वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावा. पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना, वाहतुकीला त्रास होवू नये. रस्ते दुरूस्तीकामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने नवीन व प्रगत अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करावा, असे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार, रस्ते विभागाने पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्नत मेट्रो स्थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या दुरूस्तीकामी ‘जिओ पॉलिमर’ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच स्थानिक रहिवाशांनादेखील दिलासा मिळाला आहे.
जिओ-पॉलिमर काँक्रिट हे नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास फायदेशीर बांधकाम साहित्य आहे. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर ‘सेट’ होते. खडबडीत रस्त्यांची डागडुजी या पद्धतीने करता येते. वर्दळीचे रस्ते, प्रमुख चौक (जंक्शन) आदी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने काँक्रिटीकरण करावयाचे झाल्यास वाहतूक पोलिसांच्या परवानगीने सुमारे ३० दिवसांचा ‘ब्लॉक’ घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवाशांसोबतच नागरिकांचीदेखील गैरसोय होते. यावर पर्याय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या जिओ-पॉलिमर काँक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करावा, अशी शिफारस पवईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी, मुंबई) तज्ज्ञांनी केली आहे. जिओ पॉलिमर काँक्रिट पद्धतीचा वापर सिमेंट काँक्रिट रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने करण्यात येतो. सिमेंट काँक्रिटचा रस्ता खराब झाला असेल तर संपूर्ण पृष्ठभाग न काढता खड्ड्यांमध्ये जिओ पॉलिमर काँक्रिट भरले जाते आणि ते मूळ सिमेंट काँक्रिट समवेत एकजीव होते. विशेष म्हणजे या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या २ तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येवू शकतो. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जिओ-पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे दररोज रात्री रस्ते दुरूस्ती करत दुस-या दिवशी सकाळी वाहतूक सुरळीत ठेवता येते.