जळगाव , दि.5 नोव्हेंबर :
मुक्ताईनगर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला आणि बोदवड तालुक्यातील राजुरा येथे प्रचारासाठी जात असताना त्यांच्यावरती अज्ञात इसमाने गोळीबार केला याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि मुक्ताईनगर विधानसभेच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी बोदवड पोलीस स्टेशनला भेट दिली आणि निषेध व्यक्त केला.
विनोद सोनवणे यांच्या ताफ्यावरती आज अज्ञात इसमाने बोदवड तालुक्यातील राजुरा येथे गोळीबार केला, या घटनेमुळे बोदवड पोलीस स्टेशनला नागरिकांनी एकच गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी बोदवड पोलीस स्टेशनला भेट दिली आणि घटनेची माहिती जाणून घेतली पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की , “तात्काळ आरोपीला अटक करून त्यावर कठोर कारवाई करा आणि प्रत्येक उमेदवाराला संरक्षण द्या ” तसेच त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला. अशा हल्ल्यापाठचा हेतू नेमका काय याची देखील कसून चौकशी करण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी यावेळेस केली आहे.