ठाणे , दि. 19 नोव्हेंबर :
डोंबिवलीतील उबाठा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाठा गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले होते. शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाठा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपले काम सुरू ठेवले. मात्र असे असूनही विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते. अखेर व्यथित होऊन त्यांनी उबाठा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर सोमवार दि.18 , संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
गेली अनेक वर्षे आपण चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो. मात्र सच्चा शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.