रत्नागिरी , दि. २२ :
गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. रविवारच्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. काल रात्रीपासून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी आजुबाजूच्या गावांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासांमध्ये चिपळूण आणि खेडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले. आजही जिल्ह्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाची काहीशी संमिश्र स्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगडमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तर दक्षिण रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर आज पुन्हा वाढला आहे.
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली . सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर येऊन नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली मार्गावर असलेल्या नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासन या सर्व परिस्थिवर लक्ष ठेऊन असून नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्यात.
चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. वाशिष्टी आणि शिव नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मात्र, सध्या समुद्राला भरती असल्यामुळे चिपळूण शहरातील नाईक कंपनी परिसरात वाशिष्टी नदीचे पाणी शिरले आहे. चिपळूणमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी सह्याद्री पट्ट्यात पाऊस असल्याने वशिष्ठ नदीला पूर आला आहे. चिपळूण प्रशासनाकडून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे. वशिष्ठी नदीची नाईक पुलाजवळील पाणी पातळी ४.४२ मी आहे. पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली जरी असली तरी दु १.१० वा भरती आहे. त्यामुळे पुढील अर्धा तास महत्त्वाचा आहेत. सध्या पाऊसही कमी आहे. सध्या कोळकेवाडी धरणाच्या सर्व मशीन बंद करण्यात आलेल्या आहेत. कोळकेवाडी धरणाची पातळी १३३.८० मी आहे. पुढील एक तास नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.