मुंबई दि.२३ प्रतिनिधी :
कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी आणि राष्ट्रीय सहकार धोरणातून कृषि सहकारी संस्थाना बळकटी देवून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प सादर झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या वाटचालीची यशस्वी सुरूवात असल्याची प्रतिक्रीया महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.ग्रामीण भागातील जमीनींच्या मोजणीसाठी जीएसआय प्रणाली आणि शहरी भागातील जमीन खरेदी विक्री व्यवहारांकरीता डिजीटलायझेशन प्रणालीला दिलेले प्रोत्साहनाचे त्यांनी स्वागत केले.
अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिस-या टर्मच्या सादर केलेला अर्थसंकल्पाचे स्वागत करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, या अर्थसंकल्पातून नऊ गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये प्राध्यान्याने कृषि विकास, रोजगार, महीला सक्षमीकरण, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी विशेष योजना जाहिर करण्यात आले असल्याचे सांगितले.
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देवून यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीच्या माध्यमातून एक कोटी शेतक-यांना सेंद्रीय शेती व्यवसायाशी जोडण्याच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वास व्यक्त करुन, तेल बियांची उत्पादकता, शेती उत्पादीत मालाचे मार्केटींग आणि स्टोअरेज व्यवस्थेसाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतुद महत्वपूर्ण असल्याचे विखे पाटील म्हणाले.
कौशल्य विकासातून ३० लाख तरुणांना रोजगाराची उपलब्धता करुन देण्यासाठी कौशल्य शिक्षणाला केंद्र सरकारने विशेष महत्व दिले असून, या महत्वकांक्षी उपक्रमा बरोबरच लघू सूक्ष्म उद्योगाच्या संधी ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना उपलब्ध होणार असल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. नवे कौशल्य विकास कोर्सेस सुरु करण्याबाबतही अर्थसंकल्पातून झालेले सुतोवाच स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.