Mahrashtra politics

पहिल्याच पावसाने सरकारचे पितळ उघडे पाडले ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

Share

मुंबई प्रतिनिधी , ९ जुलाई :

मुंबई आणि उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई, उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरलेअसून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही. तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते, हे अत्यंत गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केली.

मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत. पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सूत्रे असल्याने मुंबई आणि महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या कार्यालयात दोन पालकमंत्र्यांची कार्यालये मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे खाण्यासाठी काढली आहेत का? असा संतप्त सवाल करत पटोले यांनी मुख्यमंत्री हे स्वतःच्या अपयशाचे खापर पावसावर फोडत असल्याची टीका केली.

मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे, पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. मुंबईत कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली, अटल सेतूला भेगा पडल्या, हा महायुतीचा विकास आहे का? महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली, नालेसफाई केली असा सरकारचा दावा असून तो या पावसाने खोटा ठरवला. मुख्यमंत्री ग्रीन कार्पेटवर उभे राहून नालेसफाईच्या पाहणीचे बिभत्स प्रदर्शन करत होते. त्यांच्या इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला आहे. नालेसफाईत सुद्धा हातसफाई करुन खिसे भरण्याचेच काम झाले म्हणून मुंबई तुंबली, असा आरोप पटोले यांनी केला.

मुंबईत पावसाने जनजीवन ठप्प केले असताना राज्याच्या अनेक भागात मात्र अद्याप हजेरी लावलेली नाही. अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. पाणीटंचाईची अवस्था अत्यंत भयंकर आहे. टँकर माफिया आणि सरकारी अधिकारी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार फक्त मंत्रालयातून आदेश देते. पण प्रशासन खाली काहीच काम करत नाही, याकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे .


Related posts

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

editor

पुणे मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला लागली  आग ; मुंबईत  येण्यास ४५ मिनिटे उशीर

editor

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

editor

Leave a Comment