Civics Mahrashtra

धरणातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी वापर करावा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

Share

मुंबई, दि.15 जानेवारी :

धरणातील पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे. धरणाची साठवण क्षमता, सध्याची पाणी पातळी याचा नियमित आढावा घ्यावा. पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांची मागणी आणि पिकांच्या प्रकारानुसार विभागणी करून धरणातील पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने  वापर करावा अशा सूचना जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे संचालक सोनटक्के, मुख्य अभियंता अभय पाठक  यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे आणि  विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले,  पाटबंधारे प्रकल्पाची कामे नियोजनबध्द व गतीने पूर्ण करावीत.  सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी अडथळा येऊ नये असे नियोजन जलसंपदा विभागाने करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांच्या सुधारित मान्यतेचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार पूर्व विदर्भातील गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदीवर बांधकामाधिन व केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत (PMKSY) अर्थ सहाय्यीत  महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा अंतर्गत पाणी वापर संस्थेच्या बळकटीकरण अंतर्गत बैठका व प्रशिक्षणाकरिता सहभागृहाचे बांधकाम तसेच लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा अंतर्गत कार्यालयीन इमारतीच्या दुरुस्ती व विस्तार कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील अन्य १३ कामांना नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील सर्वच पदांचा आकृतीबंध त्वरित तयार करण्यात  येऊन रिक्त पदांचा अनुशेष भरण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री महाजन यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

Related posts

महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवनात

editor

प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेला गती देण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

सरकारमध्ये राहूनच आम्हाला आणि पक्षाला सहकार्य करावं; चंद्रशेखर बावनकुळे यांची देवेंद्र फडणवीस यांना विनंती

editor

Leave a Comment