मुंबई, दि. २३ प्रतिनिधी :
मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि गीता सिंघण यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.उबाठा गटाच्या रिद्धी खुरसुंगे यांच्यासह त्यांचे पती भास्कर खुरसुंगे आणि गीता सिंघण यांचे पती संजय सिंघण यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.
यातील रिद्धी खुरसुंगे यांनी प्रभाग समिती अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य म्हणून काम केले होते. तर गीता सिंघण यांनी मुंबई महानगरपालिकेत महिला आणि बालकल्याण समिती तसेच बाजार आणि उद्यान समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अथक काम करण्याची पद्धत पाहून प्रेरित झाल्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे या दोघींनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, मुंबई शहर सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनावे यासाठी आपण अनेक निर्णय घेतल्याचे सांगितले. शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावे यासाठी त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. शहरात मोकळी मैदाने असायला हवीत यासाठी मुंबई रेसकोर्सची ११२ एकर जागा आणि मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची मोकळी जागा अशी मिळून ३०० एकर जागेवर आपण सेंट्रल पार्क तयार करत असल्याचे सांगितले. हे प्रकल्प आधी देखील करायचे ठरले होते मात्र तेव्हा अचानक काही कारणामुळे त्या फाईल बंद केल्या गेल्या. यामागे कोणती कारणे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र आता आपल्या सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शहरात जागोजागी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होत आहे. मुंबईतील रखडले ले पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध यंत्रणांना एकत्र करून हे प्रकल्प पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असून मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.शिवसेनेत प्रवेश करताच ताबडतोब कामाला लागा, महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना यासारख्या योजनांचे फॉर्म ताबडतोब भरून घ्या आणि आपल्या विभागातील जास्तीत जास्त लोकाना या योजनांचे लाभ कसे मिळू शकतील ते पहा असे सांगितले.