मुंबई , दि.16 नोव्हेंबर :
मागील पाच वर्ष जनतेला वाऱ्यावर सोडणारे आमदार आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी उबाठा गट वरळीत घातपात करु शकतो, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज केला. पत्रकाराला घरात घुसून धमकी देणे, विविध वस्तू देऊन मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार वरळीत सुरु असल्याचे पावसकर म्हणाले. वरळीतील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पावसकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी वरळीतून नाही तर ठाण्यातून लढेन, अशा वल्गना आदित्य ठाकरेंनी केली होती . मात्र शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे आता उबाठा गटाकडून वरळीमध्ये दहशत माजवणे, मतदारांना विविध वस्तूंची आमिषे दाखवणे तर काही ठिकाणी मतदारांना दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप पावसकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले की , धोबीघाट रस्ता येथील साईबाबा नगर को.ऑप हौसिंग सोसायटीतल्या ओंकार टॉवरमधील बिल्डिंगच्या रहिवाशांची ११ सीसीटीव्ही लावण्याची मागणी होती. त्यापैकी उबाठाच्या उपशाखाप्रमुखाने दोन दिवसांपूर्वी तेथे ५ कॅमेरे लावले. कॅमेरा पुरवणारी कंपनी ही आदित्य ठाकरेंच्या मित्राची असून मशालला मते द्यायची आहेत, असे आवाहन या उपशाखाप्रमुखाने येथील रहिवाशांना केले. याबाबतचा व्हिडिओ आणि पुरावे सादर करुन शिवसेनेने पोलिसांत आणि निवडणूक आयोगाला तक्रार केल्याचे पावसकर यांनी यावेळी सांगितले. वरळीत पराभव दिसत असल्याने धोबीघाटमध्ये मते मिळवण्यासाठी उबाठाकडून विविध वस्तूंचे वाटप केले जात आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रेम नगरमधील उबाठाच्या शाखा क्रमांक १९६ मधील शाखा प्रमुख जिवबा केसरकर याला शुक्रवारी मारहाण करण्यात आली. याबाबत पोलिस, निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन नका, म्हणून कोविडमध्ये बॉडीबॅग घोटाळ्यात पैसे खाणाऱ्या उबाठाच्या माजी महापौर बाईंनी त्याच्यावर दबाव टाकला आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, असा दावा पावसकर यांनी केला. त्याचबरोबर साऊथ मुंबई चॅनलसाठी काम करणारे लोअर परेलचे पत्रकार अभिषेक शिंदे यांनी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बातम्या दाखवल्या म्हणून उबाठाकडून घरात घुसून मारु अशी धमकी देण्यात आली. उबाठाचे गट प्रमुख, उपशाखा प्रमुख यांनी अभिषेक शिंदे यांच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर करण्यात आला अशी माहिती पावसकर यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी वरळी कोळीवाड्यात भांडी वाटप होत असल्याचा आरोप करुन उबाठा गटाकडून खोटी तक्रार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलीसांनी यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. वरळीत उबाठा गटाने दोन आमदार कामाला लावले असून पुढील दोन तीन दिवसांत घातपात होण्याची शक्यता पावसकर यांनी व्यक्त केली.
वरळीमध्ये मुलाचे आणि राज्यभर उबाठाचे कारनामे सुरु आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली. बॅग तपासणारा अधिकारी केवळ आदिवासी समाजाचा आहे म्हणून त्याला युरिन पॉट तपासायला सांगायचे, ही मस्ती कुठून आली, असा सवाल त्यांनी उबाठाला केला. संविधान बचावचा आव आणायचा आणि दुसरीकडे एससी, एनटी, ओबीसी अशा मागास समाजातील अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची, धमकी द्यायची, व्हिडिओ व्हायरल करायचे, ही भाषा काँग्रेसच्या संगतीमुळे उबाठा बोलत आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांमुळे आलेली उबाठाची मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. उबाठा अधिकाऱ्यांना धमक्या देत असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.