मुंबई, दि.11फेब्रुवारी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२५’चे आज मुंबई येथे उद्धघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी संवाद साधला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ वर्ष शासनाच्या वतीने आयोजित या उपक्रमाची प्रगती आपण पाहात आहोत, असे सांगत राज्यभरातील बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी मुंबईकरांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद अधोरेखित केला. तसेच याठिकाणी माफक दरात मिळणाऱ्या वस्तू, त्यांचे पॅकेजिंग हे मल्टिनॅशनल कंपन्यांपेक्षा दर्जेदार असल्याचे अधोरेखित केले. बचतगटांसाठी कायमस्वरुपी मार्केट व्यवस्था उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद’च्या माध्यमातून मॉल उभारणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना स्पष्ट करत त्यात स्त्रीशक्तीची महत्वाची भूमिका अधोरेखित केली. मागील काळात माझी लाडकी बहीण, मुलींसाठी मोफत शिक्षण, मोफत एसटी प्रवास अशा अनेक योजनांमार्फत महिलाकेंद्रीत धोरण राबवले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगितले. यासोबतच ‘आता तो दिवस दूर नाही जेव्हा महिला समाजाची, राज्याची आणि देशाची धुरा सांभाळतील’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, विभागाचे प्रधान सचिव, तसेच इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.