politics

विधानसभेला अजितदादांना सहानुभूती मिळेल ! प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विश्वास

Share

मुंबई ,१३ जून :

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना सहानुभूती होती. मात्र, प्रत्येक निवडणुकीत वातावरण बदलेले असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत २४ तास काम करणाऱ्या अजित पवारांना जनतेची सहानुभूती मिळेल. बारामतीत कुणी कितीही रणनिती आखली तरी अजित पवार एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. त्यासाठी समाज माध्यमात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेला विरोधकांना यश आले. त्यामुळे आता या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काम करणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आम्हाला अंतर्मुख केले आहे. लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून आम्ही आत्मविश्वास गमावलेला नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.

अजित पवार गटाने आगामी विधानाभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणीवर भर दिला आहे. सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. शरद पवार गटाने ज्या अहमदनगर शहरात पक्षाचा वर्धानपनदिन त्या अहमदनगर जिल्ह्यातून तटकरे आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाचा व्यापक जनाधार तयार केला जाणार आहे. या दौऱ्यात काही राजकीय प्रवेश होणार आहेत, असे तटकरे म्हणाले. याशिवाय राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मागील सात-आठ दिवस आमच्या आमदारांबद्दल एक गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण परवा झालेल्या बैठकीला सगळे आमदार उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही, पण कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आहे. निकालामुळे कुणी खचलेले नाही. उलट त्यांच्याकडील काही जण आमच्या संपर्कात आहेत, असा दावा तटकरे यांनी केला.

शरद पवार गटात रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाबद्दल विचारले असता तटकरे म्हणाले, हे शीतयुद्ध नाही तर युद्ध आहे. पक्षाच्या व्यासपीठावर जाहीर भूमिका मांडली जाते आणि दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला उत्तर द्यावे लागते, हे सरळसरळ युद्ध आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आपले घर बघावे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, असा टोला तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात अजित पवारांशी हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ब्रॅण्डला धक्का बसल्याची टीका करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता, मी ऑर्गनायझर वाचलेला नाही. पण निकालानंतर दिल्लीत आमची भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच इतर नेत्यांशी भेटीगाठी झाल्या त्यात कुठेही दुजाभाव दिसला नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.

Related posts

Supreme Court Declines Urgent Hearing on Arvind Kejriwal’s Plea for Bail Extension

editor

Traffic Advisory Issued for Prime Minister Modi’s Kolkata Roadshow

editor

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार : मोदी सरकार मुस्लिमविरोधी नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

editor

Leave a Comment