मुंबई, दि. १० प्रतिनिधी :
धारावी पुनर्विकास प्रकल्पासह महसूल विभागाच्या जमीन हस्तांतराबद्दलच्या विविध प्रकल्पांच्या संदर्भात सद्यास्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी श्वेतपत्रिका काढली जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.अर्थसंकल्पातील विविध विभागांशी संबंधित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धारावी पुनर्विकासामधे संबंधित बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी मूळ निविदेत नसलेल्या बाजूच्या काही जमिनी या पुनर्विकासात समाविष्ट करण्यात आल्या, याकडे लक्ष वेधले होते. तसेच, त्यांनी यासंबंधीचा खुलासा महसूलमंत्र्यांनी करावा, अशी मागणीही केली होती.मंत्री विखे-पाटील यांनी यासंदर्भात उत्तर देताना या आक्षेपात काही तथ्य नसल्याचा दावा केला.
तसेच, महसूल खात्याशी संबंधित पुरवणी मागण्यांचा विषय असताना यात इतर विभागाच्या जमिनींशी संबंधित प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, याकडेही लक्ष वेधले. तसेच, इतर विभागांच्या मंत्र्यांकडे सभागृहातील आक्षेपांची माहिती पाठवली जाईल पण महसूल विभागाच्या जमिनींशी संबंधित हस्तांतराविषयी आणि धारावी प्रकल्पाच्या पुनरविकासासंदर्भात श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली जाईल, असे मंत्री विखे-पाटील यांनी जाहीर केले.