नाशिक, दि. 15 नोव्हेंबर:
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व आहोत. त्यांचे कार्य सर्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे स्मरण कायम ठेवण्यासाठी आपण राजापूर येथे स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येईल असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,भाजप,शिवसेना शिंदे गट,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज राजापूर येथे भव्य जाहीर सभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.
भगवान बिरसा मुंडे यांना अभिवादन करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व.मुंडे साहेब यांच्यावर माझे भावापेक्षा अधिक प्रेम होत. ओबीसींच्या प्रश्नावर भुजबळ आमचे नेते असून मी त्यांच्या पाठीशी आहे असे ते सांगायचे. आज ते नाही त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज मुंडे साहेब असते तर माझ्यावर एकही वाईट प्रसंग आला नसता. त्यांचे दुख ते आमचे दुख होते. त्यांचे सुख ते आपले सुख होते. त्यांची आठवण कधीही झाली तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही.आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आपण पुढे कायम नेऊ असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मतदार संघात आपण अनेक रस्ते,पुल,सभामंडप,बुद्ध विहार,ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय इमारती केल्या.अनेक कामे सुरु आहेत. राजापूर सह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.तसेच धुळगावसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.त्याचबरोबर येवला ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नुतनीकरण,लासलगाव विंचूर १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नुतनीकरण करण्यात येत आहे. या योजना यशस्वीपणे राबविल्या गेल्याने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.त्यामुळे महिलांची पायपीट बंद झाली असून त्यांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे.पिण्याच्या पाण्यासोबत आपण सिंचनाचा देखील प्रश्न मार्गी लावणार असून लवकरच हा मतदारसंघ टँकर मुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की,राजापूर या ठिकाणी विद्युत उपकेंद्र निर्माण केल्यामुळे या भागातील वीजेचे प्रश्न मार्गी लागले. राजापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले. ममदापूर साठवण तलाव मेळाचा बंधाराफॉरेस्ट क्लिअरन्स झाले आहे.आचारसंहिता लागायच्या एक दिवस आदी सुप्रमा सुद्धा झाली.कॉन्ट्रॅक्टरची मशिनरी येत आहे.डिसेंबर मध्ये पूर्ण काम सुरु होईल. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी खिर्डीसाठे धरणात टाकण्याचा सर्वे सुद्धा केला आहे. त्यामुळे राजापूर सह परिसराला याचा लाभ मिळणार आहे. आपण येवल्यासाठी मांजरपाडा प्रकल्प उभा केला मात्र जे विरोधक मते मागत आहे त्यांनी तो प्रकल्प पाहिला देखील नाही अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
मंत्री छगन भुजबळ यांनी आधी विकासाची कामे केली आणि मग सांगितली. त्यामुळे जी लोक खोटी आश्वासने देतात त्यांच्या विश्वास न ठेवता विकासाची कामे करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे.राजापूर परिसरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी मार्गी लावला आहे.त्यामुळे महिलाच्या डोक्यावरील हंडा खाली उतरणार आहे. त्यामुळे एक नंबर ला असलेल्या घड्याळ या निशाणीवर बटन दाबून त्यांना विक्रमी मतांनी निवडून द्यायचे आहे असे आवाहन प्रचार प्रमुख अंबादास बनकर त्यांनी केले.
येवला मतदारसंघात असे एकही गाव किंवा गट नाही जेथे मंत्री छगन भुजबळ यांनी विकासाची कामे केलेली नाही. प्रत्येक घटकांपर्यंत त्यांनी विकासाची कामे पोचविली. मतदार संघात आरोग्य संस्थांचे बळकटीकरण केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. मंत्री छगन भुजबळ हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून त्यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवायचे आहे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केले.
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या जागेवर छगन भुजबळ हेच आपले नेते आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून द्यायचे आहे असे आवाहन भाजपचे प्रमोद सस्कर यांनी केले.