मुंबई प्रतिनिधी , दि. २१ :
लोकसभेला उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मोठे यश मिळाले. त्याचा महाराष्ट्रातील विधानसभेला फायदा घेण्याचा प्रयत्न आमदार अबू आझमी यांनी सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी वांद्रे पश्चिममधील रंगशारदा सभागृहात उत्तर प्रदेशातील ३१ सपा खासदारांचा सत्कार केला. त्यांनी महाविकास आघाडीपासून वेगळे होऊन स्वतंत्रपणे विधानसभा लढण्याचे स्पष्ट संकेतही दिले. यूपीमध्ये यशस्वी झालेल्या पीडीएच्या (मागास, दलित, अल्पसंख्याक) फॉर्म्युल्यावर लढण्याची त्यांची तयारी आहे, असे स्पष्टपणे दिसून आले.
महाराष्ट्रात समाजवादी पार्टीचे दोन (अबू असीम आझमी आणि रईस शेख) आमदार आहेत. या वेळी त्यांना महाराष्ट्रात किमान १०-१२ जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. यातील बहुतांश विधानसभेच्या जागा मुस्लिमबहुल आहेत. काँग्रेस आणि उद्धवसेना आधीच मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघांवर दावा करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सपाला केवळ २ ते ४ जागा देऊ शकते, अशी स्थिती आहे.
लोकसभेला काही जागांचा निर्णय दिल्लीश्वरांनी घेतला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्याचे दिसत आहे. के. सी. वेणुगोपाल, चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व पटोलेंच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व टिळक भवनात वेणुगोपाल, चेन्नीथला, पटोलेंची बैठक टिळक भवनात झाली. त्याची माहिती देताना पटोले म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करून लवकरच मविआची जागावाटप बैठक होईल. त्यात राज्यपातळीवरील नेत्यांनाच सर्व अधिकार असतील, असे काँग्रेस श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे.