पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या 65 व्या वर्षी रखरखत्या उन्हात दिवसाकाठी 15 ते 20 किलोमीटरची पायपीट करूनही तरुणांना लाजवेल अशी उदगिरी येथील सखुबाई शेळके यांची खणखणीत आरोळी. खरेदीसाठी अबालवृद्धांची गर्दी, कष्टाच्या मानाने मोबदला मिळत नसल्याची खंत.
डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असणारी करवंद सध्या बाजारात दाखल झाली आहेत. शिराळा तसेच शाहुवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक धनगर बांधव हा रानमेवा घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागात फिरताना दिसत आहेत. त्यांच्या करवंद घ्या करवंद च्या आरोळ्यांनी परिसर घुमून जात आहे. हा रानमेवा खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात या रानमेव्याच्या सर्वाधिक जाळ्या आहेत. वर्षातून एकदाच चैत्र महिन्यात या रानमेव्याला बहर येतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष या मेव्याकडे लागलेले असतात.
सध्या हा रानमेवा परिपक्व झाला आहे त्यामुळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तो बाजारामध्ये दाखल झाला आहे. पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आंबट, गोड रसाळ हा रानमेवा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रानमेव्याला ग्रामीण तसेच शहरी भागात मागणी आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्यात अनेक धनगरवाडे आहेत. येथील धनगर बांधव तसेच महिला ही करवंदे घेऊन शिराळा,इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर कराड, सातारा या शहरांसह जवळपासच्या ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
यासाठी पहाटे पाच वाजता ते घर सोडत आहेत. रखरखत्या उन्हात पायी गावोगावी फिरून हा रानमेवा ते विकत आहेत. येताना धनगर वाड्यापासून खाली चांदोली तसेच आरळा या गावात येईपर्यंत दहा ते बारा किलोमीटरची पायपीट होते. तिथून वाहनाने ज्या शहरात जायचे त्या शहरात पोचल्यानंतर तेथील पायपीट साधारण पाच सहा किलोमीटर होते. दिवसभरात किमान पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून हे धनगर बांधव व महिला रात्री 11 ते 12 च्या सुमारास घरी पोहोचतात. दिवसभराच्या कष्टा नंतर 500 ते 600 रुपये पदरात पडतात. त्यांच्या कष्टाच्या मानाने मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. मात्र त्यावरच समाधान मानत दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने ते विक्रीसाठी बाहेर पडत आहेत.
