कल्याण, १४ जून :
के. व्ही. पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात सेव्ह पेंढारकर कॉलेज असा नारा देत आजपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केला आहे.
या उपोषणाला शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट दिली आहे व प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेऊन , या कॉलेजवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. हे कॉलेज अनुदानित आहे. ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे. त्याला सरकारची मान्यता नाही. मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरू आहे. अनुदानित ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. यामुळे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक भडकले जाणार आहेत.
कॉलेज विनाअनुदानित झाल्यावर शैक्षणिक फीमध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल. त्याचा भुर्दंड पालकांना बसेल. त्यामुळे कॉलेजच्या मनमानीविरोधात उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पेंढारकर कॉलेज बचाव मोहिमेला १५ माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर लाल बावटा रिक्षा युनियन, कामगार सेना, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बॉम्बे युनिव्हर्सिटी व कॉलेज टीचर युनियन, शिवगर्जना भाजी व फळे विक्रेते संघटना, आरएसपी शिक्षक संघटना, साईश्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था, क्रीडाशिक्षक मंडळ, पेंढरकर महाविद्यालय मित्र समूह, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.