धुले,३० मे :
मुंबईतील एका पार्टीला स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या १२ तासात जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १३ लाख ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच पोलीस इतर आरोपींचा कसून शोध घेत आहेत. आणि लवकरच इतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटलेली शंभर टक्के रक्कम रिकव्हर करू असा विश्वास पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केला आहे.
साक्री तालुक्यातील जामद्या गावातील ठग हे स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून लुटमार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठगांनी मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉप चे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला तसेच आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्मे किंमतीत देवू असे आमिष दाखविले. त्यानुसार ४४ टन कॉपर वायर २ कोटी ४४ लाख रुपयांत देण्याचे ठरले. त्यासाठी ठगांनी २२ से २३ लाखांची आगाऊ रक्कमेची मागणी केली. त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉपचे मालक हरिष पवार हे एक फॉरनर महिला सहकारी सोबत पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनी जवळ आले. सुझलॉन कंपनीच्या गेटवर हे ठग अगोदरच उभे होते, त्यांनी मुंबईतील या पार्टीला मारहाण करून हरिष पवार यांच्या ताब्यातून २२ लाख ३ हजारांची रोकड, २ लाख ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा २४ लाख ८८ हजार रुपयांचा माल लुटून नेल्याची घटना घडली.
यानंतर मुंबईच्या पार्टीने निजामपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली, त्यानुसार पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या बारा तासाच्या आतच यामधील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असे ची माहिती मिळत आहे.