छ. संभाजीनगर , दि.7 नोव्हेंबर :
15 ऑक्टोबर पासून लागू झालेल्या आचारसंहिता पासून ते आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई करत तब्बल 24 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर जवळपास 164 आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याचा दुरुपयोग निवडणुकांसाठी होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आचारसंहिता दि.१५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छत्रपती संभाजीनगर जिल्हयात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक होणार नाही याकरिता उपाययोजना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विदेशी मद्य तयार करणारे ६ घटक असून त्या ठिकाणी २३२ सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत ज्यामध्ये बिअर तयार करणारे ६ घटक असुन त्या ठिकाणी २७१ सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. तर देशी मद्य तयार करणारे २ घटक असून त्या ठिकाणी सुद्धा २२ सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत.
तर ह्या सीसीटीव्ही चे लाईव्ह फुटेज अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये घेण्यात आले असून त्याद्वारे सदर मद्य निर्माण घटकाकडील संपूर्ण व्यवहारावर देखरेख ठेवण्यात येत आहे. तसेच देशी मद्य व विदेशी मद्याचे घाऊक विक्रते, किरकोळ मद्य विक्रेते यांचेकडे कडे देखील सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ६ कार्यकारी निरीक्षक कार्यरत आहेत व १ भरारी पथक कार्यरत आहे. निवडणुकी दरम्यान मद्याची अवैध वाहतूक होऊ नये यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत आहेत.