Civics Mahrashtra

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी नमुंमपा विभाग कार्यालयांतून होणार

Share

नवी मुंबई, दि. ७ प्रतिनिधी

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि.२८ जून,२०२४अन्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. तसेच दि. ३ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयान्वये त्यामध्ये अंशत: सुधारणा करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहीत महिला यांना सदर योजनेअंतर्गत त्यांच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) बँक खात्यात दरमहा रु. १५००/- इतकी रक्कम दिली जाणार आहे. तसेच केंद्र /राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु. १५००/- पेक्षा कमी लाभ घेत असलेल्या पात्र महिला लाभार्थ्यांना फरकाची रक्कम या योजनेव्दारे देण्यात येणार आहे.

सदर योजनेअंतर्गत पात्रतेकरिता लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. तथापि परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्र राज्यात अधिवास असणा-या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणा-या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रू. २लाख ५० हज़ार पर्यंत असणे अनिवार्य आहे, तथापि पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने व जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना सदर योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ४ जुलै २०२४च्या आदेशान्वये समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे हे मुख्यालय स्तरावर नोडल अधिकारी तसेच समाजविकास विभागाचे सहा.आयुक्त प्रबोधन मवाडे हे सहा.नोडल अधिकारी असतील.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखाली विभाग कार्यालयातील कर्मचारी हे लाभार्थ्यांकडून प्राप्त होणारे अर्ज स्विकृती / तपासणी / पोर्टलवर अपलोड करणे, ऑफलाईन प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या नोंदी ठेवून त्याची पोहोच देणे इ. कार्यवाही करतील.

Related posts

शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान

editor

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना

editor

आरोपीला फायदा पोहविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तपासात मुद्दाम घोळ – विजय वडेट्टीवार

editor

Leave a Comment