नवी मुंबई , ७ जुलाई :
नवी मुंबई महानगरपालिकेची कार्यप्रणाली पूर्णत: डिजीटल व्हावी यादृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी गतीमान पावले उचलली असून ई – ऑफिस कार्यप्रणाली ऑगस्ट महिन्यात कार्यान्वित करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.
ई-ऑफिस कार्यप्रणाली व ईआरपी मॉडयूल यांच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठकीमध्ये आयुक्तांनी हे निर्देश दिले.ई-ऑफिस कार्यप्रणालीमध्ये ८२ विभागांचा समावेश असणार असून त्यासाठी आवश्यक संबंधित कर्मचाऱ्यांचा ई-डाटा संकलित करण्याची कार्यवाही ७ दिवसात पूर्ण करावी असे निर्देशित करीत याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांची असेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
ही कार्यप्रणाली वापरताना त्याकरिता कर्मचाऱ्यांचे शासकीय ई-मेल आयडी उपलब्ध् करुन घ्यावेत असेही त्यांनी निर्देशित केले.ही कार्यप्रणाली राबविण्यासाठी अभियांत्रिकी विभागात स्वतंत्र संगणक कक्ष स्थापित करण्यात येणार असून त्याठिकाणी मोठया आकाराची स्कॅनिंग उपकरणे ठेवून स्कॅनिंग सुविधा कार्यान्वित करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरु होईल हे उद्दीष्ट ठेवून संबंधित कर्मचाऱ्यांचे माहिती संकलन, त्यांची ई-मेल आयडी निर्मिती, त्यांचे आवश्यक प्रशिक्षण या बाबी पूर्ण करुन घ्याव्यात अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.