उल्हासनगर :
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या अतिप्रदूषित अशा वालधुनी नदीच्या स्वच्छता अभियानाला मनपा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील गोशाळा परिसर, वडोल गाव, हिराघाट व अन्य परिसरात वालधुनी नदीतील कचरा हटवण्याचे काम गेल्या १३ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक विनोद केणे व एकनाथ पवार यांच्या मार्गदशनानुसार ही स्वच्छता मोहिम सुरू आहे.
या मोहिमेमुळे नदीतील विषारी रसायने, सांडपाण्याची दुर्गंधी तात्पुरती कमी होईल मात्र या समस्येवर मनपा प्रशासनाने कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे तसेच नदी पात्रात अतिक्रमण होऊ नये याकडे देखील लक्ष देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.