Civics Mahrashtra

तुडुंब भरलेल्या नाल्यातील दुर्गंधी बाबत पालिका गप्प का ?

Share

मुंबई / रमेश औताडे :

पावसाळा सुरू होण्याअगोदर साफसफाईची खोटी आकडेवारी देणारी पालिकेची यंत्रणा मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उपनगरातील तुडुंब भरलेल्या गटार व मोठ्या नाल्यातील दुर्गंधी बाबत गप्प का ? असा सवाल झोपडपट्टीतील नागरीक करत आहेत.

उग्र दुर्गंधीने जनता नरक यातना भोगत असून आरोग्याच्या विविध प्रकारच्या आजाराने बळी पडत आहे. दाटीवाटीने राहत असलेली ही जनता सूर्यप्रकाशाअभावी अनेक आजारांचा सामना करत असताना त्यात भर म्हणून या गटार व मोठ्या नाल्याच्या उग्र दुर्गंधीने जनता त्रस्त आहे.

मुख्यमंत्र्यांनी हातात झाडू घेऊन फोटो पुरती गाडगेबाबा ची भूमिका प्रसिद्धी माध्यमातून आम्हाला दाखवू नये असा सवाल या ठिकाणी राहत असलेले नागरीक करत आहे. उपनगरातील नाले व गटारे सांडपाण्याऐवजी कचरा व घाणीने तुडूंब भरले असून त्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढली आहे.

मानखुर्द येथील डॉ. आंबेडकर नगर व विलास गोपले नगरच्या मधुन वाहणारा नाला गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ करण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डास, दुर्गंधीने रोगराई पसरली आहे. महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागांतर्गत प्रभाग क्रमांक १४२ मधील चित्र जवळपास उपनगरातील सर्वत्र दिसत आहे .

उपनगरातील जवळपास सर्वच झोपडपट्ट्यांतील गटारे , नाले व पर्जन्य जलवाहिण्यांनी सध्या कचरापट्टीचे रूप धारण केले आहे. या दुर्गंधी भागातील लोकप्रतिनिधी उचभ्रू कॉलनीत करोडो रुपयांच्या घरात वास्तव्यास असतात. मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभागात येणारे हे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमच्यासोबत का वास्तव्य करत नाहीत ? असा सवाल हे नागरीक करत आहेत.

महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच्या माध्यमातून साफसफाई ची कामे होत असतात. मात्र नालेसफाईचे काम वर्षातून एकदाच पावसाळापूर्व केले जाते. येथील स्थानिक रहिवासी वाद , दादागिरी , भांडण नको म्हणून नाव न छापण्याच्या अटीवर आपली गाऱ्हाणी सांगत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत होते.

नाल्यात कचरा टाकू नये म्हणून पालिकेने भिंत बांधली आहे. वाढती लोकसंख्या पाहता कचरा व्हीलेवाट करणारी पालिकेची यंत्रणा असूनही ती अदृश्य असून कंत्राटदार श्रीमंत झाला आहे व जनता आजारी पडली आहे. नाल्यातील कचरा उचलणे प्रमाण कमी झाले असल्याने नालेसफाई संदर्भात महानगरपालिकेकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहोत मात्र आमच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. नालेसफाई न केल्यास याच नाल्यातील कचरा महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात आणून टाकू असा इशारा देऊन अनेक वेळा कृती सुद्धा केली होती. तरीही पालिका व कंत्राटदार काहीच उपाययोजना करत नाहीत असे या भागातील नागरिक बोलत आहेत.

Related posts

महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेणार नाही…..?

editor

अनेक वीज कनेक्शन आता बिल भरा एकाच क्लिकवर नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

editor

वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

editor